Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली नागझरी बॅरेजची पाहणी,एनडीआरएफ पथकाच्या शिबिरास भेट
Responsive Ad Here
प्रतिनिधी सगीर मोमीन
लातूर, दि. २५ : गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे निम्न तेरणा प्रकल्प, मांजरा धरण, तेरणा आणि मांजरा नदीवरील बॅरेजच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या अनुषंगाने संभाव्य पूर परिस्थितीचा सोमवारी रात्री दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज मांजरा नदीवरील नागझरी बॅरेजला भेट देवून बॅरेज आणि नदीच्या पाणी पातळीची माहिती घेतली. तसेच संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आशिष चव्हाण, गावातील सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.
एनडीआरएफ पथकामार्फत नागझरी येथे आयोजित शोध व बचाव प्रशिक्षणालाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी भेट दिली. जिल्ह्यात एनडीआरएफ पाचवी बटालियनमार्फत आपत्ती व्यवस्थापन विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. नागझरी येथील प्रशिक्षण भेटीवेळी एनडीआरएफ पथकाचे पथक प्रमुख इन्स्पेक्टर राजू प्रसाद, सब इन्स्पेक्टर शिवलिंग आप्पा यांनी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांना प्रशिक्षण शिबिराबाबत माहिती दिली.
जिल्ह्यात 18 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत एनडीआरएफ पथकाद्वारे पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्याबाबत स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. तसेच खोल नदीपात्रात किंवा पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या बचाव कार्यामध्ये बोटीच्या वापराचे प्रात्यक्षिकाप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी स्वतः बोटीमधून जावून नदीपात्राची पाहणी केली. सध्या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफ पथकाची मदत घ्यावी लागू शकते, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
नदीपात्रात पाण्याची आवक आणि विसर्ग याचे योग्य नियोजन करून पूर स्थिती उद्भवू नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नदीपात्रामध्ये नागरिकांनी जावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत ग्रामस्तरावर सर्व नागरिकांना माहिती देवून कपडे धुणे, जनावरे धुण्यासाठी नागरिक नदीपात्रात जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420